इतिहास घडवणाऱ्याप्रती इतिहास लेखकांनी केलेला अन्याय आता दूर करण्यात येत आहे- पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारताचा इतिहास म्हणजे केवळ वसाहतवादी शक्तींनी आणि वसाहतवादी मानसिकता असलेल्यांनी लिहीलेला इतिहास नव्हे. भारताचा इतिहास म्हणजे जनतेने लोकसाहित्यातून जोपासलेला आणि पिढ्यांनपिढ्या पुढे चालत राहिलेला आहे. भारत आणि भारतीयत्व यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्यांना, योग्य ते महत्व दिले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारताचा इतिहास घडवणाऱ्याप्रती, इतिहास लेखकांची ही अनियमितता आणि अन्याय आता दूर करण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण प्रवेश करत असून या महान व्यक्तीत्वांच्या योगदानाचे स्मरण अधिकच महत्वाचे ठरत असल्याचे ते म्हणाले.