आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
भारताच्या एकूण कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरणाने 37.60 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजता उपलब्ध झालेल्या अहवालानुसार, एकूण 48,33,797 सत्रांमधून 37,60,32,586 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 37,23,367 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी प्रारंभ झाला आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
गेल्या 24 भारतात 41,506 दैनंदिन नवीन रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे.
सलग 14 व्या दिवशी 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रसरकारच्या सामूहिक प्रयत्नांचाच हा परिणाम आहे.
भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,54,118 आहे आणि देशाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी सक्रीय रुग्णसंख्या केवळ 1.47 % इतकी आहे.
महामारीच्या प्रारंभापासून ते आतापर्यंत 2,99,75,064 रुग्ण कोविड - 19 संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 41,526 जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून सध्या तो 97.20 % वर पोहोचला आहे.
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत असून गेल्या 24 तासात देशभरात 18,43,500 चाचण्या घेण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 43 कोटींपेक्षा (43,08,85,470) जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
चाचण्यांच्या दरात एकीकडे वाढ होत असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दरात सातत्याने घट होताना दिसून येत आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा 2.32 % आहे, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट आज 2.25 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर सलग 20 दिवस 3 % पेक्षा कमी आहे. तर सलग 34 दिवस तो 5 % पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस्
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा उपलब्ध करून देत, केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांकडून 75 % लसींची खरेदी करेल आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा (मोफत) पुरवठा केला जाईल.आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 38.60 कोटींपेक्षा अधिक (38,60,51,110) लसींच्या मात्रा सर्व स्रोतांच्या माध्यमांतून पुरविण्यात आल्या आहेत आणि यापुढे 11,25,140 मात्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
इटलीच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जी -20 देशांचे वित्तमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर्सच्या तिसऱ्या बैठकीत केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती. निर्मला सीतारमण सहभागी झाल्या होत्या. 9 आणि 10 जुलै 2021 रोजी झालेल्या या दोन दिवसीय बैठकीत जागतिक आर्थिक जोखीम आणि आरोग्य आव्हाने, कोविड -19 महामारीच्या संकटातून बाहेर येण्यासाठी धोरणे, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, शाश्वत अर्थव्यवस्था आणि वित्तीय क्षेत्रातील मुद्द्यांसंदर्भात विविध विषयांवर व्यापक चर्चा झाली.
Comments
Post a Comment