कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी बहुआयामी धोरण ठरवण्याची गरज: उपराष्ट्रपती


 कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी, बहुआयामी धोरण ठरवण्याची गरज आहे, असे मत उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी व्यक्त केले. त्यासाठी निरोगी जीवनशैली अंगीकारण्याबाबत एक आक्रमक जनजागृती मोहीम राबवण्यासोबतच, सामुदायिक पातळीवर वेळोवेळी आरोग्यविषयक तपासणी शिबिरे आयोजित करण्यावर त्यांनी भर दिला. यासाठी एकत्रित मोहीम राबवण्याची गरज असल्याचे सांगत, “कर्करोगाला आळा घालणे आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी एकत्र येऊया,”असे आवाहन त्यांनी केले.  

आयएफसीपीसी 2021 च्या जागतिक संमेलनाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करतांना ते बोलत होते. इंडीयन सोसायटी ऑफ कोल्पोस्कोपी अँड सर्वायकल पॅथॉलॉजीने हे जागतिक संमेलन आयोजित केले आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते, “इंडियन जर्नल ऑफ गायनॉकॉलॉजिकल ओंकॉलॉजीच्या विशेषांकाचेही प्रकाशन झाले.

गर्भाशयमुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांना होणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे, याकडे लक्ष वेधत उपराष्ट्रपती म्हणाले की गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार शक्य असून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. नियमित तपासणीमुळे त्याचे प्रमाणही कमी झाले आहे. जर आपण कर्करोगाचा सामना करण्यासाठी प्रतीबंधात्मक आणि सर्वंकष उपाय केले तर त्याचे समूळ उच्चाटन शक्य आहे,असे नायडू म्हणाले.

गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर लस उपलब्ध असून, त्यामुळे. हा आजार रोखता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.  

खाजगी रुग्णालयांनी यावर जनजागृतीसाठी ग्रामीण भागात तज्ञ डॉक्टरांचे दौरे आयोजित करावेत आणि महिलांना प्रतिबंधक उपायांची माहिती, गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्याचे तसेच लसीच्या महत्वाविषयी माहिती द्यावी, असे नायडू म्हणाले.

2020 साली जगभरात सुमारे एक कोटी लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला, यापैकी 70 टक्के मूत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Comments

Popular posts from this blog

खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे तरुणांना सक्षम करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी शिवालिक आणि कदमत ही भारतीय नौदल जहाजे ब्रुनेई येथे दाखल

केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रालयाकडून सुरू असलेल्या प्रकल्पांचा घेतला आढावा